तारकांची नवल नागरी- भाग १

       संध्याकाळच्या मावळत्या प्रकाशात आकाशात उगवणारी पहिली चांदणी आपल्या नजरेस पडते नि आपले मन एकदम उल्हासित होते. तुम्ही तिच्याकडे जरी टक लावून पाहिलेत तरी तिचा चमकणारा प्रकाश फार तेजस्वी असल्याने तो एकदम तुमच्या नजरेत स्थिरावतो. आणि जणू एखादा दिवाच आकाशात अधांतरी लागला असा तुम्हाला भास होतो. त्यामुळेच पूर्वीच्या काळी, रात्र पडली कि काही स्वर्गीय देवता एकामागून एक आकाशात दिवे लावीत जातात असा एक समज साध्या भोळ्या लोकांमध्ये झालेला होता. 


      अर्थात या गैरसमजुतीबद्दल त्या बिचाऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही म्हणा. कारण त्यावेळच्या मानाने आता आपल्याला चांदण्यांबद्दल कितीतरी अधिक माहिती मिळालेली आहे. तसे पाहिले तर दिवस काय किंवा रात्री काय तारे आकाशात आपला प्रकाश देतच असतात पण सूर्यामुळे दिवसा आजूबाजूला आकाशात जो प्रखर उजेड असतो त्यामुळे त्या आपल्याला दिसू शकत नाहीत एवढेच.   

      पण सायंकाळी जेंव्हा हळू हळू अंधार पडू लागतो तेंव्हा मात्र त्या एकामागून एक दृष्टीस पडू लागतात. मग त्या असंख्य चांदण्यांनी भरलेल्या विश्वाच्या फुलबागेचा अद्भुत देखावा पाहात आपण नुसते उभे राहतो. .अशा वेळी चंद्र उगवलेला नसला नि शहरातील दिव्यांच्या झगमगाटापासून तुम्ही दूर उभे असलात तर मग या विश्वाच्या फुलबागेची शोभा काय वर्णावी !

     अशा वेळी जर तुम्ही आकाशाकडे सारखे पाहत राहिलात तर आकाश हा जणू मोठा घुमट असून त्याला जणू काही चांदण्या चिकटवलेल्या आहेत असा तुम्हाला भास होईल दिसायला त्या चांदण्या फार तर ३-४ किलोमीटर दूर आहेत असा भास तुम्हाला होईल; इतकेच नाही तर त्यातील काही तारका जरी तेजस्वी असल्या आणि काही मंद असल्या त्या सर्व सारख्याच अंतरावर आहेत असेच तुम्हाला वाटत राहील. 

      या चांदण्यांच्या समूहात तुम्हाला काही ठिकाणी अनेक चांदण्यांचे पुंजके असलेले दिसतील. या पुंजक्यांनाच आपण नक्षत्रे असे म्हणतो. प्राचीन काळी लोकांना कुत्रा, सिंह, बैल, समुद्र-सैतान, ग्रीक कथानकातील नायकनायिका यांची चित्रे दिसत. पण आता कितीही प्रयत्न केला तरी आपल्या पूर्वजांसारखी नक्षत्रे आपल्याला दिसत नाहीत. फार तर इंग्रजीतील U, V किंवा W  यासारखे काही अक्षरांचे आकार त्यात असलेले. आपल्या दृष्टीस पडतात. तसेच फक्त उत्तरेकडील साततारकांचा पुंजका मात्र त्याच्या विशिष्ट आकारामुळे आपल्या नीटपणे लक्षात राहतो आणि त्यालाच आपण सप्तर्षी म्हणतो. 


       परंतु उत्तरेकडे सप्तर्षी सापडला म्हणजे आपले काम खूपच सोपे होते. पाहत पाहत पुढे गेलो की, आकाशाचे दोन भाग पाडणारा एक मोठा पांढरा  पट्टा पसरलेला दिसतो. तीच आपली आकाशगंगा (Milky Way). 

       पूर्वीच्या माणसाला "आपण या विश्वात कुठे आहोत? " असा प्रश्न कधी पडलाच नाही. ते आपले बिचारे सरळ असे धरून चालत कि या सर्व विश्वात आपली पृथ्वी केंद्रस्थानी असून सूर्य, चंद्र, तारे हे सर्व प्रकाश देण्याकरिता निर्माण झालेले आहेत. आणि याचे मुख्य कारण म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो; चंद्र पृथ्वीभोवती फिरतो; सूर्याप्रमाणे चांदण्याही पूर्वेस उगवतात आणि पश्चिमेस मावळतात या सर्व घटना त्यांना सरळ वाटतात. 
       पण त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी जास्त ज्ञान मिळवलेले आहे. अर्थात हे सर्व कोडे उलगण्याचे श्रेय आपल्यालाच मात्र घेता येणार नाही. कारण त्यात पूर्वजांचा बराच वाट आहे. त्यांच्यापेक्षा आज आपल्याला ज्ञान जरी अधिक असले तरी हे सर्व ज्ञान- हि सर्व प्रगती- आपण त्यांच्याच ज्ञानाच्या आधाराने साधलेली आहे हे आपण कबूल केलेच पाहिजे. 
       गेली तीनशे वर्ष आपल्याजवळ दुर्बिणीसारखे बहुमोल साधन आहे म्हणूनच आपण ही भर घालू शकलो. या दुर्बिणीमुळेच आपण अंतराळातील दूरचे खगोल अगदी आपल्या निकट असल्यासारखे पाहू शकतो. केवळ या दुर्बिणींच्याच जोरावर सूर्य,चंद्र, ग्रह, तारे,तेजोमेघ,कृष्णविवरे इत्यादींचे ज्ञान शाश्त्रज्ञांना मिळू शकले नि निसर्गनियमांची अनेक अचूक गणिते आणि सिद्धांत ते मांडू शकले. आता या दुर्बिणींचेही वेगवेगळे प्रकार आले आहेत. त्यांचा वापर करून आपण कोणतीही खगोलीय वस्तू  आकाराने किती मोठ्या आहेत, किती दूर आहेत, त्यांचे तापमान किती आहे,त्या किती गतीने व कुठल्या दिशेने फिरतात, त्या कशाच्या बनलेल्या आहेत, अशा अवघड प्रश्नांची उत्तरेदेखील आज खगोलशाश्त्रज्ञ सांगू शकतात. 
       त्या आकाशगंगेकडे  पुन्हा पुन्हा एकदा नजर टाका बरे! तुम्हाला तो अद्भुत पांढरा पट्टा दिसतो ना? तेच आपल्या घरापुढलें कुंपण आहे बरे का. आपली सूर्यमाला याच्या आतच आहे. म्हणूनच आकाशगंगेने मर्यादित असलेला भागच आपले घर आहे असे म्हणू या. 

Comments

Post a Comment